Home Technology Mobile Apps व्हॉट्सअ‍ॅपवर ध्वनी संदेशासाठी ६ नवी वैशिष्ट्ये. व्हॉइस मेसेज पाठविण्याआधी ऐकता येणार!

व्हॉट्सअ‍ॅपवर ध्वनी संदेशासाठी ६ नवी वैशिष्ट्ये. व्हॉइस मेसेज पाठविण्याआधी ऐकता येणार!

whatsapp logo shot

टंकन (टायपिंग) करण्याचा कंटाळा म्हणा किंवा पुरेश्या साक्षरतेच्या अभावी टंकन करणे जमत नसल्याने अलीकडच्या काळात व्हॉट्सअ‍ॅप वरील ध्वनी संदेश सोपे व सोयीचे माध्यम झाले आहे. व्हॉट्सअ‍ॅप वरून दररोज ७ अब्जाहून अधिक ध्वनी संदेशांची देवाण घेवाण होते. २०१३ मध्ये व्हॉट्सअ‍ॅप वर पहिल्यांदा ध्वनी संदेशाची सेवा सुरु झाली. आता याची वाढती लोकप्रियता पाहून व्हॉट्सअ‍ॅपने एकाच वेळी ६ नवी वैशिष्ट्ये यात जोडली आहेत.

१. चॅटच्या बाहेर ध्वनी संदेश ऐका
आतापर्यंत ध्वनी संदेश ऐकण्यासाठी त्याच संभाषणा (चॅट) वर रहावे लागत होते. परंतु आता एकदा का ध्वनी संदेश सुरु केला की तुम्ही ते संभाषण सोडून अन्य संभाषण जरी पाहू/करू लागलात तरी तो ध्वनी संदेश थांबणार नाही. अगदी दुसरे अ‍ॅप वापरतानाही ध्वनी संदेश ऐकता येईल.

२. ध्वनी संदेश मुद्रण (रेकॉर्डिंग) थांबवून पुन्हा सुरू करा
व्हॉट्सअ‍ॅप वर ध्वनी संदेश मुद्रित करणे बरेचदा गैरसोयीचे ठरत होते. कारण एकदा का ध्वनीमुद्रण सुरू केले की ते सलग करावे लागे. त्यात जर काही व्यत्यय आला तर पुन्हा सर्व मुद्रण पहिल्यापासून करावे लागायचे. आता नव्या वैशिष्ट्यामुळे ध्वनी संदेश मुद्रित करताना थोडा विराम (पॉज) घेऊन पुन्हा मुद्रण सुरू करू शकता. हँड्सफ्री मोडमध्ये ध्वनी मुद्रण सुरु केल्यावर हा नवीन विराम पर्याय दिसेल. दीर्घ लांबीचा ध्वनी संदेश मुद्रित करताना हे वैशिष्ट्य खूपच उपयुक्त ठरेल.

तंत्र जगतातील नव्या घडामोडी जाणून घेण्यासाठी ऑनमराठी ला भेट द्या. अपडेट रहा, पुढे चला!

३. वेव्हफॉर्म स्वरूपातील ध्वनी संदेश
व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना आता ध्वनी संदेशाच्या आवाजाचे दृश्य स्वरूप पाहता येणार आहे. याआधी एका आडव्या रेषेवर छोटा बिंदू पुढे सरकताना दिसायचा. नव्या वैशिष्ट्यामध्ये ध्वनी तरंग पद्धतीचे आलेखन दिसेल.

४. मसुदा पूर्वावलोकन: तुमचे ध्वनी संदेश पाठवण्यापूर्वी ऐका.
व्हॉट्सअ‍ॅप वर आता मुद्रण केलेले ध्वनी संदेश पाठवण्यापूर्वी ऐकता येतील. आत्तापर्यंत, मुद्रित केलेला ध्वनी संदेश न ऐकताच थेट पाठवावा लागत होता. ध्वनी संदेश मुद्रणासाठी असलेल्या नवीन पॉज आणि रिझ्युम फीचरसोबत मसुदा पूर्वावलोकनाचे हे वैशिष्ट्य काम करेल.

५. ध्वनी संदेश जिथे थांबवलात तिथूनच पुढे ऐका
या नव्या वैशिष्ट्यामुळे आता एखादा ध्वनी संदेश ऐकताना जर काही कारणामुळे थांबवावा लागला तर पूर्वी सारखा तो पुन्हा सुरुवातीपासून ऐकण्याची गरज नाही. आता ध्वनी संदेश ऐकताना विराम म्हणजेच पॉज करता येईल. जिथे ऐकणे थांबवले असेल तिथूनच पुन्हा ऐकणे (प्लेबॅक) सुरू करू शकता. लांबलचक ध्वनी संदेश ऐकताना हे वैशिष्ट्य उपयुक्त ठरेल.

६. ध्वनी संदेश जलद गतीने ऐका
व्हॉट्सअ‍ॅप वर आता 1.5x किंवा 2x वेगाने ध्वनी संदेश ऐकता येतील. व्हॉईस मेसेजच्या प्लेअर शेजारी आता नवीन ध्वनी वेग बटण दिसेल. संदेश ऐकताना त्याचा वेग वाढविण्यासाठी या बटणावर टिचकी मारू शकता. वेळ वाचविण्याचा हा उत्तम पर्याय आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या वैशिष्ट्याबद्दल तुमचे मत जरूर लिहा.

Exit mobile version