Home Technology Mobile Apps आता Google Maps सांगणार तुमच्या प्रवासमार्गावरील टोल चा दर

आता Google Maps सांगणार तुमच्या प्रवासमार्गावरील टोल चा दर

google maps on car dashboarf

लांब पल्ल्याच्या प्रवासात गुगल चा नकाशा म्हणजेच Google Maps हा एक हुकमी मार्गदर्शक बनला आहे. जवळचा रस्ता दाखविण्यापासून ते त्या रस्त्यावरील रहदारीमुळे लागणारा संभाव्य वेळ सुद्धा या अ‍ॅपमध्ये आपण पाहू शकतो. आता लवकरच Google Maps वर काही नवीन अद्यतने (अपडेट्स) येत आहेत. Google ने मंगळवारी जाहीर केलेल्या निवेदनानुसार प्रवासमार्गावरील टोल म्हणजेच पथकराचा दर, सिग्नल लाईट्स यांसारखे तपशील आता गुगलच्या नकाशात पाहायला मिळतील. यासोबतच iOS प्रणालीवर पिन करता येणारे ट्रिप विजेट आणि थेट तुमच्या Apple Watch वरून Google Maps वर दिशानिर्देश मिळवण्याचा पर्याय देखील उपलब्ध होणार आहे.

टोल दर जाणून घेऊन सर्वोत्तम मार्ग निवडा
या आधी नकाशा वापरकर्त्याला टोल (पथकर) मार्ग टाळण्याचा पर्याय उपलब्ध होता. एखाद्या मार्गावर जर पथकर असेल तर नकाशात तसे सूचित केले जाते. परंतु आता नव्या वैशिष्ट्यामुळे तुमच्या प्रवासमार्गावरील विविध ठिकाणच्या पथकराची रक्कम नकाशावर दाखवली जाईल. यासाठी गुगल स्थानिक रस्ते प्राधिकरणांची मदत घेणार आहे. पथकराची संभाव्य रक्कम दर्शविताना टोल पेमेंट पद्धती, आठवड्याचा दिवस आणि तुम्ही टोल नाका ओलांडण्याची वेळ यासारख्या घटकांचा विचार केला जाईल. पथकर मुक्त मार्ग उपलब्ध असताना तो पर्यायी मार्ग म्हणून दाखवला जाईल. आधीच्या सुविधेप्रमाणे तुम्ही टोल असलेले मार्ग टाळू शकता. तुमचे मार्ग पर्याय पाहण्यासाठी Google Maps मधील तुमच्या दिशानिर्देशांच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन ठिपक्यांवर फक्त टॅप करा आणि ‘टोल टाळा’ निवडा.

हे नवे फिचर यूएस, भारत, जपान आणि इंडोनेशिया या देशांमधील वापरकर्त्यांना याच महिन्यात Android आणि iOS वर उपलब्ध होईल. या देशांमधील जवळपास २००० टोल रस्त्यांवरील पथकराचे दार दिसू लागतील. लवकरच अन्य काही देशांमध्ये सुद्धा हे वैशिष्ट्य लागू करण्यात येईल.

अधिक तपशीलवार नकाशा
अपरिचित रस्त्यावर, विशेषत: रात्रीच्या वेळी एकटे किंवा महिला कुटुंबियांसोबत गाडी चालवणे बरेचदा तणावपूर्ण असते. एखादे वळण किंवा मार्गिका चुकली तर, ही भीती सतत मनात असते. नव्या फिचरमध्ये तुमच्‍या मार्गावरील ट्रॅफिक लाइट आणि थांब्‍याची चिन्हे दिसतील, तसेच लगतच्या इमारतींची बाह्यरेखा सुद्धा दिसू लागेल. काही निवडक शहरांमध्ये तर आणखी तपशीलवार माहिती दाखवली जाईल. उदा. रस्त्याचा आकार, रुंदी, मध्यभाग आणि वाहतूक बेटांसह तुम्ही नेमके कुठे आहात हे अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल. त्यामुळे एखादे वळण सुटणे किंवा शेवटच्या क्षणी मार्गिका बदलण्याची शक्यता कमी होईल. यासोबतच भेट देण्यासारखी ठिकाणे अधिक तपशीलांसह दर्शविली जातील.

अ‍ॅपलच्या वापरकर्त्यांसाठी नवी अद्यतने
अ‍ॅपलच्या वापरकर्त्यांसाठी सुद्धा Google ने नव्या अपडेट्सची घोषणा केली आहे. जर तुम्ही Apple Watch वापरात असाल तर दिशानिर्देश मिळविण्यासाठी iPhone वापरण्याची आवश्यकता नाही. तुमच्या Apple Watch अ‍ॅपमधील Google Maps च्या शॉर्टकटवर टिचकी मारून दिशानिर्देश प्राप्त करू शकता. यासोबतच Apple डिव्हाइसवरील Google नकाशे वापरकर्त्यांना ट्रिप विजेट, स्पॉटलाइट व सिरी मध्ये गुगल मॅप्स वापरण्याचा शॉर्टकट इत्यादी अन्य अद्यतने देखील मिळणार आहेत.

गुगल मॅप्स वर तुम्हाला अजून कोणती नवी फिचर्स पाहायला आवडतील हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा.

Exit mobile version