Home Technology Mobile Apps व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच सुरु होणार उपगटांची सुविधा

व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच सुरु होणार उपगटांची सुविधा

whatsapp logo shot

अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर व्हॉट्सअ‍ॅप ने मुख्य समूहांतर्गत लहान संख्येचे उपगट तयार करता येतील असे WhatsApp Communities नावाचे नवे वैशिष्ट्य काही निवडक चाचणी वापरकर्त्यांसाठी सादर केले आहे. अनेक उपगटांचा समावेश असलेल्या मोठ्या व्हॉट्सअ‍ॅप समूहाला समुदाय असे संबोधले जाईल. या वैशिष्ट्याचा नेमका काय उपयोग होऊ शकतो हे थोडक्यात समजून घेऊया. 

आजकाल सर्वच शाळांमध्ये पालकांचे / विद्यार्थ्यांचे इयत्तेनुसार किंवा अन्य नैमित्तिक कामांसाठी व्हॉट्सअ‍ॅप समूह बनविलेले असतात. WhatsApp Communities हे नवीन वैशिष्ट्य लागू झाल्यावर एकच मोठा समुदाय तयार करून त्यात इयत्तेनुसार लहान उपगट बनविता येतील. सर्व इयत्तांच्या विद्यार्थी व पालकांसाठी माहिती देणारा संदेश सध्या वेगवेगळ्या समूहांत फॉरवर्ड करावा लागतो. परंतु नव्या वैशिष्ट्यामध्ये एका मोठ्या समुदायात सर्वांसाठी एकच संदेश पाठविता येईल. तसेच विशिष्ट इयत्तेसाठी असलेला संदेश केवळ त्या समुदायातील त्याच इयत्तेच्या उपगटाला पाठविता येईल. 

व्हॉट्सअ‍ॅप समूहामध्ये सध्या ५१२ सदस्य जोडता येतात. हल्ली अनेक समूहांमध्ये शंभर च्या वर सदस्य असतात. अशा मोठ्या संख्येच्या समूहांमध्ये अनेकजण काही ना काही पोस्ट टाकत असतात. बरेचदा एखादे संभाषण ४ ते ५ सदस्यांपर्यंतच मर्यादित असते किंवा त्यांच्या संदर्भात असते. या संभाषणाचे अन्य सदस्यांशी काही देणे घेणे नसते. परंतु त्यामुळे सर्व सदस्यांना या संभाषणाची सारखी सूचना (नोटिफिकेशन) येत असते. तसेच अनावश्यक माहितीमुळे संभाषण पट भरून जातो. मोठ्या समूहांतर्गत उपसमूह तयार करण्याच्या या नव्या वैशिष्ट्यामुळे अन्य सदस्यांच्या दृष्टीने अनावश्यक असलेल्या चर्चा त्यांच्या संभाषण पटावर येणार नाहीत. 

व्हॉट्सअ‍ॅप समुदाय कसे काम करतील?

प्रशासक त्यांच्या समुदायांतर्गत स्वतः नवीन उपगट तयार करू शकतील. त्याचसोबत समुदायाचे सदस्य सुद्धा नवीन उपगट बनवू शकतील परंतु त्यास समुदाय प्रशासकांची मान्यता लागेल.  समुदाय प्रशासक विशिष्ट उपगटांना किंवा संपूर्ण समुदायाला संदेश पाठवू शकतील. समुदायातील सदस्य त्यांच्या आवडीनुसार व प्रशासकाच्या मान्यतेनंतर कोणत्या उपगटात सामील व्हायचे ते ठरवू शकतात. उपगट सोडला तरी सदस्य समुदायात कायम राहू शकतात. 

चाचणी वापरकर्त्यांना नवे समुदाय वैशिष्ट्य वापरण्यास दिल्याची व्हॉट्सअ‍ॅपने पुष्टी केली आहे. WABetaInfo च्या बातमीनुसार , Android वर WhatsApp beta v2.22.193 वर अद्यावत केलेल्या विशिष्ट वापरकर्त्यांसाठी समुदाय टॅब दिसत आहे. जे वापरकर्ते हे नवीन समुदाय वैशिष्ट्य पाहू शकतात त्यांना सध्या १० उपगटांपर्यंत समुदाय तयार करण्याची परवानगी दिली आहे.

Exit mobile version