Home Technology Mobile Apps गुगल फोटोज वापरा, फोनमधील जागा वाचवा, छायाचित्रं संस्मरणीय बनवा!

गुगल फोटोज वापरा, फोनमधील जागा वाचवा, छायाचित्रं संस्मरणीय बनवा!

mobile photo album

अत्याधुनिक होत जाणाऱ्या फोनमुळे आणि वाढत्या मेगापिक्सेल कॅमेरा लेन्समुळे मोबाईल फोनद्वारे काढल्या जाणाऱ्या छायाचित्रांची जशी संख्या वाढत आहे तसा त्या छायाचित्रांचा आकारसुद्धा वाढत जात आहे. त्यामुळे कितीही जास्त जागा असलेला फोन घेतला तरी वाढत्या छायाचित्रांच्या संख्येमुळे त्यातील जागा लवकरच भरून जाते. बरं हे फोटो हार्ड ड्राइव्ह किंवा पेन ड्राइव्ह मध्ये काढून ठेवल्यास जेंव्हा ते पुन्हा पाहावेसे वाटतात तेंव्हा ते लगेच सापडत नाहीत. या समस्येवर गुगल फोटोज हा नामी उपाय आहे. जवळपास सर्वच अँड्रॉइड फोनमध्ये हे अ‍ॅप आधीच स्थापित असते परंतु नसल्यास आपण ते प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता. तुमचे गुगल खाते या अ‍ॅपला जोडले की कॅमेऱ्याने काढलेल्या सर्व छायाचित्रांचा बॅकअप आपोआप घेतला जातो. ही छायाचित्रे तुमच्या गुगल खात्यातील जागेमध्ये साठवली जातात. छायाचित्रे गुगलच्या सर्व्हरवर अपलोड होत असल्यामुळे एकदा का बॅकअप झाला की गुगल फोटोजच्या मेन्यू मध्ये जाऊन Free up space या पर्यायावर टिचकी मारून फोनमधील ज्या छायाचित्रांचा सर्व्हरवर बॅकअप झाला आहे तेच फोटो डिलीट केले जातात.

फोटो बॅकअप सेटिंग
फोटो बॅकअप म्हणजेच ते गुगलच्या सर्व्हरवर साठवले जातात. छायाचित्रं साठविण्यासाठी तुम्हाला तीन पर्याय मिळतात. स्टोरेज सेव्हर, एक्सप्रेस व ओरिजिनल या प्रकारांत छायाचित्रं साठवता येतील. ओरिजिनल म्हणजे मूळ आकारात साठविण्याचा पर्याय निवडलात तर तुमच्या गुगल खात्याची सर्व जागा यासाठी संपून जाईल. स्टोरेज सेव्हर पर्यायात मूळ फोटो १६ एमबी तर एक्सप्रेस प्रकारात ३ एमबी पर्यंत रिसाईझ केले जातात.

फोटो एडिट करा सहजपणे
गुगल फोटोज चा अजून एक महत्वाचा उपयोग म्हणजे तुम्हाला छायाचित्र संकलित करण्यासाठी अजून एखादे अ‍ॅप डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही. यात तयार इफेक्ट्स सोबतच तुमच्या इच्छेप्रमाणे रंग, आकार, प्रकाश, इत्यादी बाबी बदलू शकता. एडिट केलेले फोटो सेव्ह केल्यानंतरही मूळ स्वरूपात हवे तेंव्हा डाउनलोड करता येतात.

अ‍ॅनिमेशन, व्हिडीओ व कोलाज बनवा
अपलोड केलेल्या छायाचित्रांचा जसा अल्बम बनविता येतो तसेच निवडक छायाचित्रांचे अ‍ॅनिमेशन, व्हिडीओ व कोलाज स्वरूपात सुद्धा रूपांतर करता येते.

तंत्र जगतातील नव्या घडामोडी जाणून घेण्यासाठी ऑनमराठी ला भेट द्या. अपडेट रहा, पुढे चला!

शेअरिंग करणं एकदम सोपं
तुमच्या गुगल फोटोज मधील छायाचित्रं जोपर्यंत तुम्ही शेअर करत नाहीत तोपर्यंत ती खाजगीच असतात. तुम्ही एखादा अल्बम किंवा एखादा फोटो इतरांसोबत शेअर करू शकता. अल्बम ज्यांच्या सोबत शेअर केला आहे त्यांना सुद्धा त्यांच्याकडील फोटो त्यात जोडण्याची अनुमती देता येते. एखादा विशिष्ट फोटो सुद्धा निवडून व्हाट्सअप अथवा अन्य मेसेंजर वर पाठवता येतात.

आठवणी साजऱ्या करा
मेमरीज हे गुगल फोटोजचे सर्वात सुंदर वैशिष्ट्य आहे. फोटो काढणं म्हणजे आठवणी चित्रबद्ध करणं. गुगल फोटोज भूतकाळातल्या आठवणी वरचेवर तुमच्या समोर नेमक्यावेळी सादर करतं. मागील वर्षी किंवा अमुक वर्षांपूर्वी आजच्या दिवशी काढलेले फोटो मेमेरीजच्या स्वरूपात तुमच्या समोर येतात.

इंटेलिजेंट शोध सुविधा
छायाचित्रं अपलोड झाल्यावर सोबत माहिती जोडता येते. परंतु प्रत्येकवेळी हे शक्य होत नाही. गुगल फोटोज मध्ये मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत असल्याने छायाचित्रं शोधताना लक्षात असलेला एखादा संदर्भ जरी शोधला तरी सर्व संबंधित फोटो तुमच्या समोर येतात. उदा dog असे सर्च केल्यास ज्या ज्या चित्रांमध्ये कुत्रा आहे ती सर्व छायाचित्रं दिसू लागतील. सर्च चिन्हावर क्लिक केल्यास विविध छायाचित्रांमधील वेगवेगळे चेहरे दिसतात. यापैकी कोणत्याही चेहऱ्यावर टिचकी मारल्यास त्या व्यक्तीची सर्व छायाचित्रे दिसू लागतात.

एकदा का तुम्ही वापर सुरु केला की आपोआपच तुम्हाला या अ‍ॅपची अन्य वैशिष्ट्ये समजतील. वरचेवर या अ‍ॅपमध्ये वेगवेगळे बदल होत असतात. मात्र महिन्यातून किमान एकदा तरी फ्रीअप स्पेस या पर्यायावर क्लिक करून फोनमधील जागा मोकळी करत रहा. गुगल फोटोज वापरण्याचा तुमचा अनुभव आम्हाला खाली कमेंट द्वारे कळवा.

Exit mobile version