Home News आता पालकांना मुलांच्या इंस्टाग्राम खात्यावर नियंत्रण ठेवता येणार

आता पालकांना मुलांच्या इंस्टाग्राम खात्यावर नियंत्रण ठेवता येणार

Instagram

एक काळ असा होता की तरुण पिढी फेसबुकवर अक्षरशः पडून असायची. पण काळ बदलला तशी नव्या पिढीची समाज माध्यमं सुद्धा बदलली. आता फेसबुकवर मुख्यतः मध्यमवयीन, प्रौढ व जेष्ठ नागरिकांचा वावर राहिला आहे. तरुण पिढीला आता इंस्टाग्राम ने भुरळ घातली आहे. नुसती भुरळ नाही तर अक्षरशः वेड लावले आहे. काही मुलं याचा अतिरेकी वापर करत असून त्यामुळे त्यांच्यात वर्तनाच्या समस्या आढळून आल्या आहेत. 

विविध देशांमधील सरकार व सामाजिक संस्थांकडून आलेल्या दबावामुळे आता मेटाने (म्हणजेच पूर्वीच्या फेसबुक कॉर्पोरेशनने) त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील सर्वात तरुण वापरकर्त्यांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने पॅरेंटल कंट्रोल टूल्स म्हणजेच पालक नियंत्रण साधनांचे फिचर सादर केले आहे. या सुविधेची सुरुवात जरी इन्स्टाग्रामपासून होत असली तरी लवकरच मेटाच्या अन्य समाज माध्यम उत्पादनांवर सुद्धा या पालक नियंत्रण सुविधा उपलब्ध होतील.

इंस्टाग्रामवर १३ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या कोणालाही खाते उघडता येते. त्यामुळेच अनेक वर्षांपासून पालक आणि कायदा करणाऱ्या विविध संस्था Meta कडे किशोरवयीन मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षण सुविधा देण्याचा आग्रह करत आहेत. या दबावामुळे कंपनीने आता “फॅमिली सेंटर” नावाने पालकांचे नियंत्रण ठेवण्याची सुविधा सादर केली आहे. 

Meta च्या या “फॅमिली सेंटर” मध्ये काय आहे?
फॅमिली सेंटर हे मेटा कंपनीची उत्पादने वापरणाऱ्या कुटुंबांसाठी आणि त्यांच्या किशोरवयीन मुलांसाठी सुरक्षित ठेवण्याचे साधन आहे. हे सुरक्षा सुविधांचे केंद्र म्हणून विकसित केले आहे.  यात पालकांना त्यांची किशोरवयीन मुले काय पाहू शकतात आणि ॲपवर काय करू शकतात याबद्दल माहिती देते. पालकांसाठीच्या या सुरक्षा नियंत्रणांमधील साधने त्यांची मुले ॲपवर किती वेळ घालवतात यावर लक्ष ठेवू देतील तसेच त्यांनी कोणती खाती फॉलो केली आहेत, त्यांना कोणी फॉलो केले आहे यासारख्या तपशीलांमध्ये प्रवेश दिला जाईल. किशोरवयीन मुलांनी जर एखादी बाब फ्लॅग म्हणजे अनुचित म्हणून ध्वजांकित केल्यास त्याची सूचना पालकांना प्राप्त होईल. 

या नवीन सुरक्षा सुविधांशिवाय मागील वर्षी कंपनीने, किशोरवयीन मुलांनी Instagram साठी नोंदणी केल्यास त्यांच्या खात्यांना खाजगी खात्यांमध्ये परिवर्तित करणे आणि प्रौढ वापरकर्त्यांना त्यांचे अनुसरण (follow)  न करणार्‍या किशोरवयीनांना थेट खाजगी संदेश DM करण्यापासून रोखणे या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

कंपनीने एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की आम्ही आमच्या ॲपवर किशोरवयीन मुलांसाठी ज्या गोष्टी  सुचवतो त्याचा आम्ही कठोर आढावा घेत आहोत. ज्या व्यक्तींना किशोरवयीन मुले अनुसरण (follow) करत नाहीत अशा लोकांना आम्ही संबंधित किशोरवयीन मुलांचा आमच्या माध्यमांवर उल्लेख करण्यापासून तसेच त्यांना टॅग करण्यापासून रोखू. याचसोबत किशोरवयीन मुले एखाद्या विशिष्ट विषयावर दीर्घकाळ विचार करत असल्याचे आढळल्यास त्यांना वेगवेगळ्या विषयांकडे वळविण्याचा प्रयत्न केला जाईल असेही कंपनीने म्हटले आहे. “पुढील काही महिन्यांत, आम्ही अतिरिक्त वैशिष्ट्ये जोडू, ज्यामध्ये पालकांना त्यांची किशोरवयीन मुले किती वेळ Instagram वापरू शकतील याची मर्यादा आखता येईल. याचसोबत किशोरवयीन मुलांच्या खात्यावर नजर ठेवण्यासाठी एकापेक्षा अधिक पालकांची क्षमता समाविष्ट करू असे मेटाने आपल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे. 

मेटा चे फॅमिली सेंटर Facebook आणि Instagram वर कधी सुरु होत आहेत?
फॅमिली सेंटर प्रथम १६ मार्च २०२२ पासून युनायटेड स्टेट्समध्ये इंस्टाग्रामवर आणले जाईल. या वर्षाच्या अखेरपर्यंत Meta च्या VR प्लॅटफॉर्म आणि Facebook सह तिच्या उर्वरित ॲपवर ही सुविधा आणण्याची योजना आखत आहे.

मुलांच्या Instagram खात्यावर पालकांना कसे नियंत्रण ठेवता येईल?
मेटा ने सादर केलेली नवीन पालक नियंत्रणे मुलांच्या खात्याशी आपोआप जोडली जाणार नाहीत. तुमच्या मुलांना त्यांच्या Instagram खात्यांमधून नवीन संरक्षण सुविधा सक्षम करावी लागेल. जर तुमच्‍या मुलाने त्‍यांच्‍या खात्‍यावरून ही सुविधा सक्षम केली नाही, तर त्‍यांना चालू करण्‍याचा कोणताही मार्ग पालकांजवळ नाही.

Exit mobile version