Home Finance २०० रुपयांपेक्षा कमी रकमेचे पेमेंट आता UPI Lite द्वारे ऑफलाइन मोडमध्ये करता...

२०० रुपयांपेक्षा कमी रकमेचे पेमेंट आता UPI Lite द्वारे ऑफलाइन मोडमध्ये करता येणार

UPI offline payment

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे व्यवहार करण्याची पद्धत मागील काही वर्षात खूपच लोकप्रिय झालेली आहे. मॉल मधील ब्रँडेड दुकानांपासून ते रस्त्यावरील भाजीवाल्यांपर्यंत अगदी सहजतेने युपीआय द्वारे पैसे स्वीकारले जात आहेत. आता इंटरनेट कनेक्टिव्हीटी नसलेल्या ठिकाणी सुद्धा युपीआय द्वारे व्यवहार करण्यासाठी UPI Lite ही ऑफलाइन व्यवहार पद्धती नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे लवकरच सादर होणार आहे. ऑफलाइन डिजिटल पेमेंट म्हणजे असा व्यवहार ज्यासाठी इंटरनेट किंवा टेलिकॉम कनेक्टिव्हिटीची आवश्यकता नसते. 

दिनांक ३ जानेवारी २०२२ रोजी भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने (RBI) तिच्या संकेतस्थळावर ऑफलाइन मोडमध्ये २०० रुपयांपेक्षा लहान मूल्याच्या डिजिटल पेमेंट्सची सुविधा देण्यासाठी आकृतिबंध प्रसिद्ध केला. या नवीन फ्रेमवर्क नुसार कार्ड, वॉलेट्स, मोबाईल उपकरणे इत्यादी कोणत्याही माध्यम किंवा साधनांचा वापर करून असे ऑफलाईन व्यवहार प्रत्यक्ष समोरासमोर असतानाच केले जाऊ शकतात. अशा व्यवहारांना प्रमाणीकरणाच्या अतिरिक्त घटकाची (AFA) म्हणजे ऑथेंटिकेशन कोडची आवश्यकता नसेल. तसेच हे व्यवहार ऑफलाइन असल्याने ग्राहकाला व्यवहार केल्याच्या काही वेळानंतर एसएमएस किंवा ई-मेलद्वारे सूचना प्राप्त होतील. 

UPI Lite सुविधा कशी वापरता येईल?

एकदा का ऑफलाईन व्यवहारांची सुविधा सुरु झाली की तुमच्या UPI अ‍ॅप्सवर ऑफलाइन मोडमध्ये लहान-मूल्याचे व्यवहार करण्यासाठी UPI Lite सक्षम करण्याचा पर्याय दिसू लागेल. जर तुम्ही ही सुविधा सक्षम केली तर तुमच्या खात्यातून २००० रुपये या सुविधेसाठी अग्रीम पद्धतीने जमा होतील. UPI ​​Lite जोपर्यंत तुमच्या  अ‍ॅप्सवर सक्षम आहे तोपर्यंत ही २००० रुपयांची रक्कम फक्त ऑफलाईन व्यवहारांसाठीच राखीव असेल. तुम्ही कधीही ही सुविधा अक्षम करून हे पैसे पुन्हा तुमच्या बँक खात्यात वळते करू शकता. एका वेळी केवळ २०० रुपयांपर्यंतच्या मूल्याचेच व्यवहार ऑफलाईन पद्धतीने करू शकता. परंतु अशा व्यवहारांच्या संख्येवर कोणतीही मर्यादा टाकलेली नाही. ऑफलाईन सुविधेतील २००० रुपयांची राखीव रक्कम संपेपर्यंत तुम्ही कितीही व्यवहार करू शकता. फक्त एका व्यवहाराचे मूल्य हे २०० रुपयांपेक्षा अधिक नसेल. 

ऑफलाईन व्यवहारांसाठीचा २००० रुपयांचा राखीव निधी संपल्यावर पुन्हा २००० रुपये ऑफलाईन व्यवहार सुविधेसाठी हस्तांतरित करावे लागतील. परंतु ही शिल्लक भरणा केवळ ऑनलाइन पद्धतीनेच होऊ शकते.

पेटीएमसह सध्याच्या मोबाइल वॉलेटप्रमाणेच UPI लाइटमध्ये उपलब्ध शिल्लक व्याजरहित असेल. यात व्यवहार करण्यासाठी वापरकर्त्यांना UPI पिन प्रविष्ट करण्याची देखील आवश्यकता लागणार नाही. NPCI ने मात्र  UPI वापरकर्त्यांना अ‍ॅप वापरण्यासाठी पासकोड किंवा डिव्हाइस ऑथेंटिकेशन ठेवण्याची शिफारस केली आहे.

व्यवहार करताना, UPI Lite साठीची शिल्लक UPI अ‍ॅपच्या होम स्क्रीनवर प्रदर्शित होईल. तसेच ज्या व्यवहारांचे मूल्य रु.२०० पेक्षा कमी असेल त्या व्यवहारांसाठी UPI Lite मधील शिल्लक रकमेचा वापर केला जाईल. UPI Lite चे व्यवहार तपशील UPI अ‍ॅपच्या ट्रान्झॅक्शन हिस्ट्री पेजवर उपलब्ध असतील. 

युपीआय अ‍ॅपवरील ऑफलाइन पेमेंट मोड ग्राहकाची संमती मिळाल्यानंतरच सक्षम केला जाऊ शकतो. ऑफलाइन व्यवहारांमुळे कमकुवत इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेल्या भागात डिजिटल व्यवहारांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे. 

विविध अभ्यासांद्वारे असे आढळून आले आहे की भारतातील एकूण किरकोळ व्यवहारांपैकी सुमारे ७५ टक्के व्यवहार (रोख रकमेसह) हे  ₹ १०० च्या खालील मूल्याचे असतात. NPCI च्या म्हणण्याप्रमाणे UPI द्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांपैकी सुमारे ५० टक्के व्यवहार हे ₹ २०० मूल्याच्या खालील आहेत. 

UPI लाइट प्रत्यक्ष वापर करण्यासाठी ग्राहकांना कधी उपलब्ध होईल याबद्दल अजूनतरी अधिकृत घोषणा झालेली नाही मात्र पुढील दोन ते तीन महिन्यांत ही सुविधा प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला RBI ने देशातील 40 कोटी फीचर फोन वापरकर्त्यांसाठी ‘123Pay’ ही UPI सेवा सादर केली. NPCIच्या संकेतस्थळावर उपलब्ध तपशीलांनुसार, फेब्रुवारी २०२२ मध्ये UPI द्वारे 8,26,843 कोटी रुपयांचे व्यवहार केले गेले.

Exit mobile version