Home News झूम व गुगल मीट ला आव्हान देण्यासाठी WhatsApp ची दोन नवी वैशिष्ट्ये...

झूम व गुगल मीट ला आव्हान देण्यासाठी WhatsApp ची दोन नवी वैशिष्ट्ये येणार !

whatsapp logo shot

व्हाट्सअपने घोषणा केली आहे की फोनवर नवीनतम आवृत्ती स्थापित असणाऱ्या वापरकर्त्यांसाठी कॉल लिंक्स हे नवे वैशिष्ट्य या आठवड्याच्या शेवटी उपलब्ध होईल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवरील एका पोस्टमध्ये, मेटा कंपनीचे प्रमुख मार्क झुकरबर्गने व्हाट्सअप कॉल लिंक्स वैशिष्ट्य आणत असल्याची घोषणा केली आहे. हे वैशिष्ट्य  वापरकर्त्यांना समूह संभाषणासाठी एक दुवा (लिंक) तयार करण्यास आणि तो  मित्र आणि कुटुंबामध्ये सामायिक करण्यास अनुमती देते. 

व्हाट्सअपची सुरुवात जरी अतिशय छोट्या समूहाचे खाजगी संदेश देवाण घेवाण करणारे अ‍ॅप अशी झाली असली तरी आता टेलिग्राम व अन्य नव्या सन्देश अ‍ॅप च्या तीव्र स्पर्धेमुळे व्हाट्सअप त्याच्या सेवांचा परीघ वाढवत आहे. काही दिवसांपूर्वी व्हाट्सअपने एका मोठ्या समूहांतर्गत अनेक लहान उपगट तयार करता येतील अशा व्हाट्सअप समुदाय या नव्या वैशिष्टयाची घोषणा केली होती. गुगल मीट व झूम मीटिंग्ज यांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी व्हाट्सअपने पूर्वीच्या दोन व्यक्तींपासून ते अगदी अलीकडे व्हिडीओ कॉल मध्ये ८ व्यक्तींना सहभागी होण्याची सुविधा दिली आहे. 

आता याचाच पुढचा भाग म्हणून लवकरच कॉल लिंक हे वैशिष्ट्य व्हाट्सअपला जोडले जाणार आहे. Google Meet किंवा Zoom Meetings प्रमाणे तुम्ही ध्वनी किंवा चलचित्र संभाषणासाठी लिंक म्हणजेच दुवा तयार करू शकता. हा दुवा इतर समाज माध्यमावर सहजपणे शेअर केला जाऊ शकतो. या दुव्यावर टिचकी मारून अन्य व्यक्ती कॉल मध्ये सहभागी होऊ शकतात. कॉल्स टॅबमध्ये ‘कॉल लिंक्स’ पर्याय जोडला जाईल. याद्वारे व्हाट्सअप वापरकर्त्यांना नवीन कॉल सुरू करता येईल किंवा चालू असलेल्या कॉलमध्ये सामील होता येईल. यामुळे एखाद्या कॉल मधून जरी तुम्ही काही वेळासाठी  बाहेर पडलात तरी त्या कॉलच्या दुव्यावर टिचकी मारून पुन्हा त्यात सामील होता येईल.

हे नवे वैशिष्ट्य या आठवड्याच्या शेवटी उपलब्ध होईल, परंतु त्यासाठी वापरकर्त्यांना ते व्हाट्सअपची नवीनतम आवृत्ती वापरत असल्याची खात्री करावी लागेल. दरम्यान, व्हाट्सअपने असेही घोषित केले आहे की ते लवकरच मेसेजिंग अ‍ॅपवर ३२ सहभागींसाठी समूह व्हिडिओ कॉलची चाचणी सुरू करतील.

सध्या व्हाट्सअप तुम्हाला ग्रुप व्हॉईस कॉलमध्ये ३२ व व्हिडीओ कॉल मध्ये ८ सहभागी जोडू देते. हे वैशिष्ट्य अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींच्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. 

Exit mobile version