Home Culture होळी का साजरी करतात माहिती आहे का? सणामागील विविध आख्यायिका

होळी का साजरी करतात माहिती आहे का? सणामागील विविध आख्यायिका

Stories behind celebration of Holi festival

children celebrating holi colour festival

होळी हा भारतात जवळपास सर्वत्र साजरा केला जाणारा सर्वात लोकप्रिय आणि रंगीबेरंगी सण आहे. याला “रंगांचा उत्सव” म्हणून देखील ओळखले जाते. हिंदू पंचांगाप्रमाणे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळीचा सण साजरा केला जातो. इंग्रजी कॅलेण्डर प्रमाणे विचार केल्यास बरेचदा होळीचा सण मार्च महिन्यात येताना दिसतो. वसंत ऋतुचे स्वागत करण्यासाठी आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो.

होळीच्या सणाशी संबंधित अनेक दंतकथा प्रचलित आहेत. या दंतकथा प्राचीन हिंदू पौराणिक कथांशी संबंधित आहेत. परंतु या सर्व कथांमध्ये भक्त प्रल्हाद आणि होलिका या राक्षसिणीची कथा ही सर्वात प्रसिद्ध आख्यायिका आहे. प्रल्हाद हा भगवान विष्णूचा भक्त होता, परंतु त्याचा पिता राजा हिरण्यकशिपू हा एक राक्षस होता. हिरण्यकशिपूला प्रल्हाद भगवान विष्णूची करीत असलेली भक्ती मुळीच आवडत नव्हती. त्यामुळे तो प्रल्हादाला मारहाण करीत असे.

हिरण्यकशिपूची बहीण होलिका हिला एक वरदान प्राप्त होते. या वरदानामुळे तिच्यात अग्नीला प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण झाली होती. आग तिला जाळू शकत नव्हती. तिने एके दिवशी प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसण्यास सांगितले आणि त्याला मारण्यासाठी तिने अग्नीत प्रवेश केला. त्या आगीमुळे होलिका जळून राख झाली, पण भक्त प्रल्हाद भगवान विष्णूच्या भक्तीमुळे सुरक्षित राहिला. त्यामुळेच या घटनेची आठवण म्हणून वाईटावर चांगल्याचा हा विजय होळीच्या वेळी प्रतिकात्मक होलिका पेटवून साजरा केला जातो. दक्षिण कोकण व गोव्यात हा सण शिमगा नावाने ओळखला जातो.

होळीशी संबंधित आणखी एक आख्यायिका म्हणजे भगवान कृष्ण आणि राधा यांची कथा. या कथेनुसार, भगवान कृष्णाला राधाच्या गोऱ्या रंगाचा हेवा वाटला आणि तिला आपल्यासारखे दिसण्यासाठी ते तिच्यावर खेळकरपणे रंग टाकायचे. भगवान श्रीकृष्णाच्या या खेळकर कृतीने होळीच्या वेळी रंग खेळण्याच्या परंपरेला जन्म दिला असे म्हणतात.

महाराष्ट्रातील कोकणात, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या भागात स्थानिक देव देवता यांची पालखीतून मिरवणूक काढली जाते. गावातल्या घरांमध्ये पालखी नेली जाते. तसेच पालखी खांद्यावर धरून नाचवली जाते. होळी पेटविण्यासाठी रानातून माड किंवा झाडाचे मोठे खोड कापून आणतात. ते कापण्यापूर्वी त्या झाडाची क्षमा मागितली जाते. त्याला आलिंगन दिले जाते आणि विधिवत पूजा केल्यानंतर ते तोडले जाते. होळीच्या निमित्ताने विशेष नृत्य सुद्धा केले जाते.

कथा कोणत्याही असल्या तरी आज मात्र भारताच्या विविध भागात हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो. लोक एकमेकांवर रंग उधळतात आणि नाच गाण्याचा आनंद लुटतात. होळी म्हणजे लोकांनी आपापसातील मतभेद विसरून एकोपा आणि प्रेमाच्या भावनेने एकत्र येण्याचा सण आहे.

Exit mobile version