Home Culture २२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा

२२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा

ram sita, laxman and hanuman in pushpak viman

२२ जानेवारी २०२४ हा समस्त भारतीयांच्या जीवनातील एक अभूतपूर्व सोनेरी क्षण आहे. आपली पिढी भाग्यवान आहे कारण सुमारे पाचशे वर्षांच्या लढ्यानंतर प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान मुक्त होऊन त्याजागी अतिभव्य असे श्रीराममंदिर उभे राहिले आहे. हिंदू कालगणनेनुसार एकाच वर्षात दोन दिवाळी उत्सव साजरा करण्याचे भाग्य आपण अनुभवणार आहोत. प्रत्येक भारतीयांच्या आयुष्यातील हा सोनेरी क्षण पुढील आयुष्यभर आपण जपून ठेवणार आहोत. हा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी काही गोष्टी नक्कीच करा:

१. चित्त आणि वृत्ती सात्विक राहण्यासाठी किमान २० ते २२ जानेवारी या काळात मद्यपान व अन्य व्यसनांपासून दूर राहावे, मांसाहार करू नये. शाकाहारी जेवण सुद्धा सात्विक असावे. ब्रह्मचर्याचे पालन करावे.

२. श्रीराम मंदिर स्थापित होण्यासाठी मागील अनेक पिढ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्या सर्वांच्या प्रति कृतज्ञता म्हणून आपल्या अंगणात किंवा बाल्कनीत वा खिडकीत एक दिवा प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पूर्वसंध्येला (२१ जानेवारी रोजी सायंकाळी) लावून त्यांचेही स्मरण करूया.

३. घराची व अंगणाची साफसफाई करून दिव्यांच्या माळा, फुलांचे तोरण व पताका यांनी सजावट करावी. आकाशकंदील, पणत्या, फटाके, रांगोळी, सुगंधी धूप, अत्तर घालून दीप प्रज्वलन करावे, दारात रांगोळी काढून रामरायाचे स्वागत करूयात.

४. हा दिवाळी सण साजरा करण्यासाठी फराळा प्रमाणे गोडधोड पदार्थ घरी करूया. प्रभू श्रीरामाला नैवेद्य दाखविण्यासाठी स्वहस्ते एखादा सात्विक व पारंपरिक गोड पदार्थ तयार करावा.

५. घरात जर रामाची मूर्ती किंवा प्रतिमा नसेल तर घरातील लहानग्याना कागदावर प्रभू रामाचे चित्र काढायला सांगून २२ तारखेला त्यांच्या हस्ते पूजन करूयात.

६. २२ जानेवारीच्या दिवशी ज्यांना शक्य असेल त्यांनी उपवासाचे व्रत करावे. १००८ राम नामाचा जप करावा. ११ वेळा रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे.

७. प्रतिष्ठापनेच्या मुहूर्ताला राम प्रतिमेला फुले व तुळस अर्पण करून रामरक्षा स्तोत्र, हनुमान स्तोत्र म्हणावे.

८. कुटुंबातील व शेजारातील लहान मुलांना या दिवसाचे महत्त्व समजावून सांगा. रामजन्मभूमी मुक्तीसाठी दिलेला लढा थोडक्यात माहिती द्यावी. हा दिवस घरातील लहान मुलांच्या मनावर कोरला गेला पाहिजे. सगळ्या तयारीत त्यांना सहभागी करून घ्या. मुलांना रामाचे एखादे गीत अथवा भजन गायला सांगा. रामायणातील एका कथेचे वाचन करायला सांगा.

९. जवळच्या राम किंवा मारुती मंदिरात अन्यथा कोणत्याही देवतेच्या मंदिरात नवीन कपडे घालून सहकुटुंब जाऊन प्रार्थना करावी.

१०. हा आनंद केवळ आपला नसून समस्त भारतीयांचा आहे त्यामुळे वंचित व गरीब वस्ती मधील लोकांना सुद्धा या सोहळ्यात सहभागी करून घ्या. ज्यांना शक्य असेल त्यांनी अशा वस्ती मध्ये रामाच्या नावाने भंडारा म्हणजेच अन्नदान करावे. मिठाईचे वाटप करा. किमान पाच गरजू घरांमध्ये थोडा शिधा द्यावा.

आपल्या जीवनात दोन वेळा दिवाळी साजरी करण्याचा योग हा ५०० वर्षांच्या प्रतिक्षे नंतर आला आहे. स्वतः आनंद साजरा करा आणि आपल्या शेजारील लोकांना पण यात सहभागी करून घ्या! जय श्रीराम।

Exit mobile version