Home Technology Mobile Apps माझी ट्रेन कुठे आहे आणि कधी येणार या प्रश्नांची उत्तरं देणारे ॲप

माझी ट्रेन कुठे आहे आणि कधी येणार या प्रश्नांची उत्तरं देणारे ॲप

तुम्ही जर वरचेवर लांब पल्ल्याच्या ट्रेन ने प्रवास करत असाल तर Where  Is My Train हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये असायलाच हवे. यात अगदी तिकीट बुक करण्यापासून ते ट्रेनची सद्यस्थिती जाणून घेण्यासोबतच अशा अनेक सोयी आहेत ज्याने तुमचा रेल्वे प्रवास अगदी आरामदायी होईल. चला तर जाणून घेऊया हे ॲप तुम्हाला कसं मदत करेल ते. 

ट्रेन कुठे आहे ते जाणून घ्या 

तुमची ट्रेन यावेळी  नेमकी कोणत्या ठिकाणी आहे हे जाणून घेण्यासाठी यात ट्रेनचा क्रमांक टाका आणि लगेचच तुम्हाला ट्रेन नुकतेच कोणते स्थानक पार केले आहे ते कळेल. तसेच तुमच्या स्थानकापर्यंत अंदाजे किती वेळेत ट्रेन पोहचेल ते सुद्धा दर्शविले जाईल. या सुविधेचा उपयोग फक्त तुम्ही प्रवास करतानाच नाही तर तुमचे कुटुंबीय अथवा मित्र मैत्रिणी बाहेरगावाहून येणार असतात तेंव्हा त्यांना आणायला जाताना सुद्धा त्यांची ट्रेन कुठे पोहोचली आहे ते कळण्यासाठी होईल. 

आसन, डब्बा व फलाट क्रमांक 

तुमची ट्रेन कुठे आहे हे तर कळलं पण ती तुम्ही चढणार त्या स्थानकात कोणत्या फलाटावर येणार आहे याची माहिती सुद्धा तुम्हाला यात मिळेल. समजा एखाद्या वेळी यात बदल जरी झाला तरी ट्रेन च्या आतील प्रवाशांना फलाट क्रमांक अद्ययावत करण्याची सुविधा आहे जेणेकरून इतर प्रवाशांना या माहितीचा लाभ होईल. फक्त पीएनआर क्रमांक टाकून ट्रेन मधील तुमच्या आसनाची जागा तसेच तो डबा म्हणजेच कोच इंजिनपासून कोणत्या क्रमांकावर आहे हे सुद्धा तुम्हाला यात पाहता येणार आहे. 

स्थानक गजर सुविधा

तुम्ही प्रवास करत असलेली ट्रेन तुमच्या इच्छित स्थानकात जर मध्यरात्री किंवा पहाटे लवकर पोहोचणार असेल तर आपण मोबाईल मध्ये ट्रेनच्या वेळापत्रकाप्रमाणे गजर लावतो. परंतु कधीकधी तुमची ट्रेन तुम्ही झोपलेले असताना काही कारणांमुळे उशिरा धावते. तसेच आधीच उशिरा निघालेली ट्रेन कधी पोहचेल याचा अंदाज येत नाही. अशावेळी या ॲप मध्ये तुम्ही तुमचे स्थानक येण्याच्या विशिष्ट मिनिटे आधीचा गजर (अलार्म) लावू शकता. ट्रेनच्या वेळेत कितीही बदल झाला तरी तुम्ही निवांत झोप घेऊ शकता. 

इंटरनेट शिवाय चालेल ऍप 

या ॲपचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या मोबाईलवर जर काही कारणामुळे इंटरनेट सेवा उपलब्ध नसेल तरी यामध्ये मोबाईल टॉवरच्या माध्यमातून ट्रेनचे स्थान अद्ययावत केले जाते. विशेषतः जेंव्हा तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत असता तेंव्हा बरेचदा इंटरनेट सेवा नीट मिळत नाही अशावेळी हे ॲप खूपच कामाचे आहे. 

तिकिटाचे आरक्षण करू शकता

तुम्हाला रेल्वेचे तिकीट आरक्षित करायचे असेल तर या ॲप मध्येच ती सुविधा आहे. तुम्हाला हव्या त्या स्थानकापासून अन्य स्थानकापर्यंत कोणकोणत्या रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत, त्यांचे वेळापत्रक काय आहे, किती जागा उपलब्ध आहेत तसेच सर्वसाधारण, शयनयान, वातानुकूलित, इत्यादी वर्गांचे नेमके भाडे किती आहे याची सुद्धा माहिती उपलब्ध आहे. 

गुगल प्ले स्टोअर वरून हे ॲप तुम्ही मोफत डाऊनलोड करू शकता. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे तुमच्या मोबाईलची अतिशय कमी जागा व्यापते. फक्त १० एमबी एवढी जागा लागते. हे ॲप मराठी सहित अन्य ६ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. 

Exit mobile version