Home News आता YouTube Shorts द्वारे कमावता येतील पैसे.

आता YouTube Shorts द्वारे कमावता येतील पैसे.

watching YouTube on mobile

TikTok जरी भारतात बंद झाले असले तरी अल्प कालावधीचे व्हीडिओ बनविण्याचे व एका मागोमाग एक पाहण्याचे वेड भारतीयांमध्ये काही कमी झालेले नाही. उलट इंस्टाग्राम रिल्स व युट्युब शॉर्ट्स च्या माध्यमातून ते अधिकच वाढले आहे. या लोकप्रियतेवर स्वार होऊन आपला व्यवसाय वाढविण्याचा चंग Meta आणि Google सारख्या मोठ्या तंत्र कंपन्यांनी बांधला आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून Google ने आता YouTube Shorts वरील निर्माणकर्त्यांना जाहिरातीचे उत्पन्न विभागून देण्याची घोषणा केली आहे. नुकत्याच एका ब्लॉग पोस्टमध्ये, YouTube च्या क्रिएटर प्रॉडक्ट्सचे उपाध्यक्ष अमजद हनीफ यांनी याची माहिती दिली आहे. 

YouTube Shorts वर पैसे कसे कमावता येतील?

आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की  यूट्यूब वर स्वतः बनविलेले व्हिडीओ अपलोड करून निर्माणकर्त्यांना यूट्यूबच्या भागीदार योजनेत सहभागी होता येते. यामध्ये अशा चित्रफितींवर दाखविल्या जाणाऱ्या जाहिरातींच्या उत्पन्नातील काही रक्कम Google  यूट्यूबर्सना देते. सन २००७ पासून गुगलने  YouTube Partners Program (YPP) सुरु केला आहे. भारतासहित अनेक देशांतील यूट्यूबर्स या योजनेद्वारे उत्तम कमाई करीत आहेत. आता गुगलने ही योजना YouTube Shorts च्या निर्मात्यांसाठी लागू करण्याची घोषणा केली आहे. वर्ष २०२३ च्या सुरुवातीपासून, शॉर्ट्स-केंद्रित निर्माते ९० दिवसांमध्ये १००० सदस्यांची मर्यादा आणि १० लाख Shorts व्ह्यूज पूर्ण करून YPP ला अर्ज करू शकतात. शॉर्ट्स बनविणारे नवीन निर्माते यूट्यूबच्या अन्य उत्पन्न साधनांचा सुद्धा लाभ घेऊ शकतील. 

शॉर्ट्स फीडमधील व्हिडिओ दरम्यान जाहिराती चालविल्या जातात. प्रत्येक महिन्याला, या जाहिरातींमधून मिळणारा महसूल एकत्रितपणे जोडला जाऊन शॉर्ट्स निर्मात्यांना पैसे देण्यात येतील. निर्मात्यांना मिळणाऱ्या  एकूण रकमेची मर्यादा जाहिरात उत्पन्नाच्या ४५% इतकीच राहील. 

Shorts क्रिएटर्ससाठी इतर नवीन वैशिष्‍ट्ये

YouTube स्टुडिओ मध्ये लवकरच  YouTube क्रिएटर म्युझिक हे नवे साधन उपलब्ध करून दिले जाईल. YouTube निर्मात्यांना त्यांच्या दीर्घ व्हिडिओमध्ये वापरण्यासाठी संगीत सूरावटींचा कॅटलॉग उपलब्ध केला जाईल. याद्वारे युट्युबर्स त्यांना हवे असल्यास एखाद्या सुरावटीचे किंवा गाण्याचे संगीत परवाने खरेदी करू शकतात. याप्रकारे बनविलेल्या व्हिडिओंवरील पूर्ण कमाई ते स्वतः ठेऊ शकतात. जे निर्माते संगीत परवाना खरेदी करू इच्छित नाहीत ते सुद्धा वरील कॅटलॉग मधील संगीत, गाणी वापरू शकतील परंतु त्यांना त्यांच्या उत्पनातील काही वाटा वापर केलेल्या संगीत निर्मात्यांना द्यावा लागेल. क्रिएटर म्युझिक, सध्या यूएस मध्ये चाचणी तत्वावर चालू आहे. २०२३ मध्ये अन्य काही देशांमध्ये या सेवेचा विस्तार करण्यात येईल. 

यासोबतच YouTube चाचणी तत्वावर Super Thanks for Shorts सादर करत आहे. हे वैशिष्टय सुद्धा पुढील वर्षी पूर्णपणे सुरु होणे अपेक्षित आहे. यामध्ये दर्शक त्यांच्या आवडत्या शॉर्ट्सबद्दल कौतुक दर्शवू शकतात आणि निर्माता खरेदी केलेल्या, हायलाइट केलेल्या सुपर थँक्स टिप्पण्यांद्वारे त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधू शकतात.

Exit mobile version