Home News मार्चमध्ये नव्या शिवाई ई-बस मुंबई-पुणे मार्गावर धावणार

मार्चमध्ये नव्या शिवाई ई-बस मुंबई-पुणे मार्गावर धावणार

MSRTC to start new Shivai electric buses on Mumbai Pune route

MSRTC Shivai electric bus

मुंबई/पुणे : विजेवर धावणाऱ्या ७५ नव्या शिवाई बस (E-buses) गाड्या मार्च मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या MSRTC ताफ्यात समाविष्ट होणार आहेत. यातील ५० बस मुंबई-पुणे-मुंबई मार्गावर चालविण्याचे नियोजन असून उर्वरित २५ बस पुणे ते कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद आणि सोलापूर या मार्गावर चालवल्या जातील. एसटी मधील जाणकारांच्या मते मुंबई-पुणे-मुंबई या मार्गावरील भाडे अंदाजे ३५० रुपये ठेवण्याचा प्रस्ताव आहे. सध्या मुंबई-पुणे-मुंबई या गर्दीच्या मार्गावर धावणारी लोकप्रिय शिवनेरी बसचे भाडे ५३५ रुपये इतके आहे. शिवाई बस सध्या पुणे-अहमदनगर मार्गावर धावत आहेत.

मुंबई-पुणे (Mumbai-Pune) मार्गावरील या नव्या ई-बस परळ, ठाणे आणि बोरिवली येथून चालतील. एप्रिल अखेरपर्यंत एकूण १०० इलेक्ट्रिक बस दोन्ही शहरांमध्ये धावतील, असे एमएसआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले. डिझेलवर चालणाऱ्या सर्व शिवनेरी एसी बसेसच्या जागी पर्यावरणपूरक शिवाई (इलेक्ट्रिक) बसेस आणण्याची योजना महामंडळ आखत आहे.

केंद्र सरकारच्या फेम-2 अनुदान योजनेंतर्गत या बस खरेदी केल्या जात आहेत. विनाव्यत्यय प्रवास सुनिश्चित करण्यासाठी मुंबई आणि पुणे येथे जास्तीत जास्त ई-चार्जिंग पॉइंट्सउभारले जातील. एमएसआरटीसीचा दररोजचा डिझेल खर्च सुमारे ८.८ कोटी रुपये आहे. शिवाई बसेसमुळे राज्य परिवहन महामंडळावरील डिझेलचा बोजा मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल आणि त्यामुळे बचत होईल.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी घोषणा केली होती की राज्य बस महामंडळ त्यांच्या ताफ्यात एकूण ५,१५० पर्यावरणपूरक आणि आवाजविरहित इलेक्ट्रिक बसेस आणि डिझेलवर चालणाऱ्या आणखी २,००० बस खरेदी करणार आहेत. याशिवाय, MSRTC च्या ५००० डिझेलवर चालणाऱ्या बसेसचे रूपांतर द्रवीभूत नैसर्गिक वायू (LNG) इंधनात केले जाईल जे कमी परिचालन खर्चासह स्वच्छ आहे. टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आलेल्या नवीन एलएनजी बसेस वातानुकूलित असतील. गतवर्षी १ जून रोजी पुणे ते अहमदनगरदरम्यान सर्वप्रथम दोन शिवाई बस सुरू करण्यात आल्या होत्या.

Exit mobile version