नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी आज (मंगळवार २२ मार्च २०२२ रोजी) लोकसभेत सांगितले की इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती लवकरच कमी होतील आणि पुढील दोन वर्षांत त्या पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या बरोबरीने येतील. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या २०२२-२३ आर्थिक वर्षाच्या अनुदान मागणीवर लोकसभेत उत्तर देताना गडकरींनी हे विधान केले. तसेच त्यांनी किफायतशीर स्वदेशी इंधनाकडे वळण्याच्या गरजेवर भर दिला आणि हे इंधन लवकरच प्रत्यक्षात येईल असेही आशा व्यक्त केली. अशा इंधनामुळे प्रदूषण पातळी कमी होण्यास मदत होईल.
यावेळी त्यांनी खासदारांना वाहतुकीसाठी हायड्रोजन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन करून त्यांच्या जिल्ह्यांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करून हरित हायड्रोजन तयार करण्यासाठी पुढाकार घेण्यास सांगितले. हायड्रोजन हा लवकरच सर्वात स्वस्त इंधनाचा पर्याय असेल, असे ते म्हणाले.
गडकरी म्हणाले की “मी नक्कीच सांगू शकतो कि जास्तीत जास्त दोन वर्षात इलेक्ट्रिक स्कूटर, कार, ऑटोरिक्षाची किंमत पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटर, कार, ऑटोरिक्षा एवढीच असेल. तंत्रज्ञानात वेगाने प्रगती होत असल्याने लिथियम-आयन बॅटरीच्या किमती कमी होत आहेत. आम्ही झिंक -आयन, अॅल्युमिनियम-आयन, सोडियम-आयनचे रसायन बॅटरी बनविण्यासाठी विकसित करत आहोत. जर तुम्ही पेट्रोलसाठी १०० रुपये खर्च करत असाल, तर इलेक्ट्रिक वाहनावर तुम्ही १० रुपये खर्च कराल,”
महामार्ग जोडणी आणि रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या सुधारणांवर प्रकाश टाकताना गडकरी म्हणाले की, पूर्वी चार तासांच्या तुलनेत आता दिल्लीहून मेरठला जाण्यासाठी फक्त 40 मिनिटे लागतात. ”बांधकामाची किंमत कमी करणे आणि दर्जा सुधारणे हे आमचे उद्दिष्ट आहे”, असे सांगून ते म्हणाले की गेल्या वर्षी भारताने प्रति दिवशी ३८ किमी रस्ते बांधणीचा जागतिक विक्रम गाठला आहे. समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी डिसेंबर २०२४ पूर्वी देशातील रस्ते पायाभूत सुविधा अमेरिकेच्या दर्जाप्रमाणे असतील.”