Home History आंतरराष्ट्रीय महिला दिन: ८ मार्च रोजीच का साजरा करतात?

आंतरराष्ट्रीय महिला दिन: ८ मार्च रोजीच का साजरा करतात?

Why women;s day is celebrated on 8th March every year

working mother

दरवर्षी ८ मार्च रोजी जगभरातील महिलांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी आणि लिंग आधारित भेदभाव नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women’s Day) साजरा केला जातो. हा दिवस स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने आजवर केलेल्या कार्याची जशी स्मृती जपतो, त्यासोबतच महिलांना समान हक्क आणि संधी सुनिश्चित करण्यासाठी अजूनही आवश्यक असलेल्या कामांची सुद्धा आठवण करून देतो.

जागतिक महिला दिन साजरा करण्यामागील इतिहास:

१९०८ साली न्यूयॉर्क शहरातील कापड कारखान्यातील महिला कामगारांनीं कामाच्या ठिकाणाची वाईट परिस्थिती आणि महिलांना मिळणाऱ्या कमी वेतनाविरोधात निषेध म्हणून आंदोलन केले. महिलांच्या या संघर्षाचा सन्मान करण्यासाठी अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने २८ फेब्रुवारी १९०९ रोजी एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमापासून प्रेरणा घेत १९१० साली कोपनहेगन येथे झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय श्रमिक महिला परिषदेत, क्लारा झेटकिन या जर्मन महिला हक्क कार्यकर्तीने दरवर्षी असा महिलांचा सन्मान करणारा दिवस साजरा करण्याची कल्पना मांडली. परिषदेत सहभागी झालेल्या १७ देशांतील १०० हून अधिक महिलांनी या कल्पनेला एकमताने मंजुरी दिली. परंतु त्यावेळी महिला दिनासाठी कोणतीही अधिकृत तारीख ठरवली गेली नव्हती.

पहिला अधिकृत आंतरराष्ट्रीय महिला दिन १९ मार्च १९११ रोजी ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये साजरा करण्यात आला. तेथे महिलांना काम, मतदान आणि सार्वजनिक पद धारण करण्याच्या अधिकारांच्या मागणीसाठी हजारो महिला आणि पुरुष विविध ठिकाणी मोर्चात सहभागी झाले होते. महिला दिनाची सुरूवातीला कोणतीही अशी एक तारीख निश्चित नव्हती. परंतु युरोपात साधारणपणे फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या सुरुवातीला तो साजरा केला जात असे. अमेरिकन लोक मात्र फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी “राष्ट्रीय महिला दिन” साजरा करत होते.

रशियाच्या पेट्रोग्राड (आता सेंट पीटर्सबर्ग) येथे ८ मार्च १९१७ रोजी महिला कापड कामगारांनी अन्न आणि शांततेच्या मागणीसाठी शहरातून मोर्चा काढला. १९१७ साली फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी, रशियन महिलांनी पहिल्या महायुद्धात २० लाखाहून अधिक रशियन सैनिकांच्या मृत्यूच्या निषेधार्थ “ब्रेड अँड पीस” म्हणजेच अन्न व शांततेसाठी संप सुरू केला. त्याचे परिवर्तन पुढे चळवळीत झाले ज्यामुळे रशियन झारचा पाडाव झाला आणि जगातील पहिले समाजवादी सरकार स्थापन झाले. या सरकारने महिलांना मतदानाचा अधिकार दिला. त्यावेळी रशियामध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्युलियन कॅलेंडरप्रमाणे रविवार २३ फेब्रुवारी रोजी महिलांचा संप सुरू झाला होता. मात्र अन्य देशांमध्ये वापरात असलेल्या ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार तोच दिवस ८ मार्च हा होता. त्यामुळे ज्याने रशियन क्रांतीची सुरुवात केली तो ८ मार्च हा दिवस महिला दिन साजरा करण्यासाठी निवडण्यात आला.

संयुक्त राष्ट्र संघातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची घोषणा:

१९७५ साली संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यास सुरुवात केली. ते वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केले गेले. १९७७ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने सदस्य राष्ट्रांना ८ मार्च हा महिला हक्क आणि जागतिक शांततेसाठी अधिकृत दिवस म्हणून घोषित करण्यासाठी आवाहन केले. तेव्हापासून दरवर्षी ८ मार्च रोजी जगातील अनेक देशांमध्ये अधिकृतपणे महिला दिन साजरा केला जातो. दरवर्षी महिलांच्या हक्कांसंदर्भात विशिष्ट संकल्पना किंवा एखाद्या समस्येवर केंद्रितवेगवेगळे कार्यक्रम वर्षभर राबविले जातात.

आंतरराष्ट्रीय महिला दिन लैंगिक समानतेच्या दिशेने पाऊल उचलण्याची एक संधी आहे. महिलांना शिक्षणाच्या सामान संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या समान वेतनासाठी समर्थन देणे, महिलांच्या व्यवसायांना संधी देणे किंवा महिला आणि मुलींना सक्षम करणार्‍या संस्थांसोबत स्वयंसेवा करणे अशा अनेक उपक्रमात सहभागी होऊन तुम्ही तुमची भूमिका बजावू शकता.

“महिला नेतृत्व: महामारी नंतरच्या जगात समान भविष्य निर्माण करणे.” ही आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२३ ची संकल्पना आहे. ही संकल्पना कोविड-19 महामारीचा स्त्रियांवर, विशेषत: समलिंगी स्त्रिया, कमी उत्पन्न असलेल्या स्त्रिया आणि विकसनशील देशांतील महिलांवर झालेला परिणाम दर्शविते. यात आरोग्यसेवा कर्मचार्‍यांपासून शास्त्रज्ञांपर्यंत, राजकीय नेत्यांपर्यंत, साथीच्या आजारादरम्यान महिलांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवरही प्रकाश टाकला आहे.

Exit mobile version