ओला इलेक्ट्रिकच्या दोन माजी अधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या स्टार्टअपने देशभरातील इलेक्ट्रिक वाहन (EV) आगीच्या वाढत्या संख्येला रोखण्यासाठी उपाय शोधल्याचा दावा केला आहे.
विजेरी वाहन म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) ची सध्या चलती व बोलबाला आहे. बरेचजण विजेरी वाहनांना पसंती देत आहेत. कारण याचा प्रति किलोमीटर खर्च परंपरागत इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. परंतु याची एक मोठी समस्या आहे. ती म्हणजे या वाहनांमध्ये अलीकडे आग लागण्याचे प्रमाण अनेकदा दिसून आले. त्यामुळे बरेच संभाव्य ग्राहक अजूनही द्विधा मनस्थितीत आहेत.
परंतु या समस्येवर आता एका स्टार्टअपने उपाय शोधल्याचा दावा केला आहे. मिंट या वृत्तपत्राच्या बातमीनुसार बेंगळुरूस्थित स्टार्टअप ईएमओने सांगितले की, ते गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्या बॅटरी पॅकची प्रतिकूल परिस्थितीत चाचणी करत आहेत. या चाचण्यांना बऱ्यापैकी यश आले असून आता ते ग्राहकांना संपूर्ण अग्निसुरक्षेची हमी देण्यास सक्षम आहेत. तसेच त्यांच्या या नव्या संशोधनामुळे बॅटरीचे आयुष्य देखील वाढवले जाते ज्यामुळे ईव्हीचे एकूण आयुष्य वाढते.
ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) मध्ये बॅटरी विभागात काम करणारे राहुल पटेल आणि शीतांशू त्यागी यांनी या नव्या कंपनीची स्थापना केली आहे. पटेल यांनी याआधी सन मोबिलिटी येथे थर्मल अभियांत्रिकीचे नेतृत्व करणारे केले होते तर त्यागी यांनी ईव्ही-स्टार्टअप एथर एनर्जीमध्ये डिझाइन आणि उत्पादन पैलूंवर काम केले आहे.
त्यागी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या सोल्यूशनमध्ये पेटंट-प्रलंबित विशेष द्रवपदार्थाचा समावेश आहे जो बॅटरी पॅक मधील उष्णता शोषून घेऊन अन्यत्र वितरित करतो, यासोबतच मशीन लर्निंग चालित बॅटरी मॅनेजमेंट सिस्टमच्या साहाय्याने पॅक मधील वेगवेगळ्या सेल वर लक्ष ठेवून त्यांचे तापमान व स्थिती यावर लक्ष ठेवतो.
“संपूर्ण बॅटरी एका विशेष गैर-वाहक आणि ऊर्जा शोषणाऱ्या अर्ध-घन द्रवामध्ये गुंतलेली आहे. आम्ही त्याचे पेटंट घेतले आहे आणि भारतातील काही रासायनिक प्रयोगशाळांसह ते विकसित केले आहे. आम्ही त्यामध्ये आमची स्वतःची इलेक्ट्रॉनिक प्रणाली विकसित केली आहे, जी संपूर्ण पॅकमध्ये उष्णता प्रसारित करते. त्यामुळे, जर पॅकमधील एक सेल गरम होऊ लागला, तर ही संपूर्ण यंत्रणा ओव्हरड्राइव्हमध्ये जाईल, तिथून उष्णता बाहेर काढेल आणि इतर सर्वत्र वितरित करेल,” त्यागी म्हणाले. वर नमूद केलेला द्रव ही उष्णता शोषून घेतो आणि संपूर्ण पॅकवर पसरतो, ज्यामुळे आग लागण्याच्या घटना कमी होतात.
आग लागणे ही भारतातील परवडणाऱ्या ईव्हीच्या प्राथमिक समस्यांपैकी एक आहे. उत्पादक त्यांचे बॅटरी पॅक तयार करण्यासाठी स्वस्त सेल वापरतात आणि डिझाइनमधील त्रुटी, गुणवत्तेचा अभाव इत्यादींमुळे एका सेलमध्ये बिघाड होताच ईव्हीला आग लागते.
कंपनी सध्या दुचाकी आणि तीन-चाकी वाहनांवर लक्ष केंद्रित करत असून लवकरच चारचाकी आणि ट्रकपर्यंत विस्तारित करण्याची आणि त्याच्या पॅकमध्ये जलद चार्जिंग जोडण्याची योजना आखत आहे. OEM आणि बॅटरी स्वॅपिंग फर्मसाठी स्वतंत्र पुरवठादार बनण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे.
एका भारतीय बॅटरी स्वॅपिंग स्टार्टअपच्या संस्थापकाने नाव न सांगण्याच्या अटीवर प्रतिक्रिया दिली की. “कोणत्याही सेलला आग लागू शकते, अजूनतरी आग न लागण्याची 100% हमी कोणीही देऊ शकत नाही. फक्त तुम्हाला सेल एका मर्यादेत काम करेल याची काळजी घ्यायची आहे, जी बरेच चांगले उत्पादक घेतात. मर्यादा ओलांडल्यास कोणतीही बॅटरी व्यवस्थापन प्रणाली किंवा बॅटरी डिझाइन आग थांबवू शकत नाही. तो पुढे असेही म्हणाला की जोपर्यंत आपण स्वतःचा सेल बनवत नाही तोपर्यंत या समस्यांचे निराकरण करणे कठीण आहे.